कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा अ.भा.साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्यावर बहिष्कार ! #sahity samelan
साहित्यिकांना मिळणारी अस्पृश्यत्वाची वागणूक आणि दुजाभाव मिटवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे ठरवायला हवीत-लक्ष्मण खोब्रागडे

चंद्रपूर: साहित्यातून संस्कृती आणि भाषेचे संवर्धन व्हावे , त्यासाठी साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारचे करोडो रुपयांचे अनुदान घेऊन साहित्य संमेलन आयोजित केल्या जाते . पण अनुदान सरकारी असले तरी आयोजन खाजगी असल्याने त्यात विषमतेची बीजे पेरली जातात, याची प्रचिती अनेकांना आलेली आहे .
नुकतेच ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित केले असून , त्यात कविकट्ट्यावर झाडीबोलीचे कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या कवितेची निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले. पण त्या पत्रातील आशय वाचून संतप्त भावना व्यक्त करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी कविकट्ट्यावर बहिष्कार टाकला आहे .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवींना मानधन , प्रवास भत्ता , निवास , भोजन व इतर सोइ देय असून कविकट्ट्याच्या नावाखाली गर्दी जमा करायला बोलावलेल्या कवींकडून भोजन व निवास सोईच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली करून एका प्रमाणपत्रावर बोळवण केली जाते . यावर रोष व्यक्त करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी आयोजकांना विचारणा केली असता , कोणतेही उत्तर मिळाले नाही . त्यामुळे साहित्यक्षेत्रातील या विषमतावादी वागणुकीचा धिक्कार करीत लक्ष्मण खोब्रागडे यांनी या साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्यावर बहिष्कार टाकलेला आहे.
शासन जरी उदात्त हेतूने संमेलनासाठी अनुदान देत असले, तरी ही साहित्यिकांना मिळणारी अस्पृश्यत्वाची वागणूक आणि दुजाभाव मिटवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे ठरवायला हवीत, म्हणजे आयोजकांकडून कोणालाही गौनत्वाची वागणूक न मिळता सरकारी अनुदानातून निरपेक्ष उद्देश साध्य होईल . असाही विश्वास लक्ष्मण खोब्रागडे यांनी व्यक्त केला .

Post a Comment

0 Comments