अश्रूंची फुले होताना...! While the flowers of tears... !परमेश्वर कधी कधी आपली परीक्षा पाहत असतो, असं मला वाटतं. आपण माणूस म्हणून कसे आहोत, इतरांशी कसे वागतो, कोणत्या वेळी नक्की कोणते निर्णय घेतलेले योग्य ठरतात... या सगळ्याचीच ती परीक्षा असते. माझ्या वैद्यकीय आयुष्यात घडलेल्या एका घटनेची आवर्जून आठवण होते. एका तातडीचे उपचार मिळू न शकलेल्या मरणासन्न तरूण मुलाला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून खेचून आणल्याचा तो प्रसंग अजूनही जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहतो.

ती जवळपास २५-२६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. संध्याकाळची वेळ होती. त्यावेळी सकाळच्या शिफ्टच्या वेळी आलेल्या माझ्या रुग्णांना सहा-सहासाडेसहाला तपासून झालं होतं. त्यावेळी ज्यांच्यामुळे मी शिकलो ते माझे काका- त्यांना मी खेडेगावातून चंद्रपूरला स्थायिक होण्यासाठी आणलं होतं. कारण माझ्या जडणघडणीत त्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली होती व माझं भवितव्य पण घडवलं होतं. ते शिलाई मशीनचं काम करायचे. पोंभुर्णा नावाचं आमचं गाव होतं. ते चंद्रपूरला राहायला आल्यावर प्रॅक्टिस संपली की मी वेळ काढून त्यांना भेटायला जात असे.
त्या दिवशी प्रॅक्टिस आटोपल्यावर त्यांच्याकडंच चाललो होतो. त्या भागात जाताना रस्त्यावर भानापेठ नावाचा एक भाग लागतो. तिथून जात असताना मला एक ओळखीची गाडी दिसली, ती लाल रंगाची मारूती होती. त्या गाडीच्या जवळ गेलो तसा त्या गाडीचा क्रमांक मला ओळखीचा वाटला. हा क्रमांक होता, ७८६. एकदम लक्षात आलं, अरे, ही गाडी तर आमच्या हैदरभाईची आहे, इथं कशी काय उभी? हैदरअली हा माझा बॅडमिंटनच्या खेळातला सोबती होता. बॅडमिंटन खेळणाऱ्या आम्हा दहाबारा लोकांचा ग्रुप. त्या गाडीजवळ गेलो तर त्यांच्या गाडीतून मला एका महिलेच्या मोठमोठ्यांदा रडण्याचा आवाज आला. म्हटलं, काय झालं, या गाडीतून असा आवाज का येतो आहे?
त्यावेळी माझ्याकडे मारूती ८०० गाडी होती. माझी गाडी मी एका जागेवर लावली. हैदरभाईच्या गाडीजवळ जाऊन पाहिलं तर आतमधलं दृष्य खूपच भयानक होतं. हैदरभाई डोळे बंद करून स्टेअरिंगवर डोकं टेकून खिन्नपणे पडून होते. त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी बसली होती. ती रडत होती, ‘बचाओ बचाओ, कोई मदद करो’ म्हणून विनंती करत होती.
मी तिथं जाऊन विचारलं, ‘‘काय झालं?’’
त्या म्हणाल्या, ‘‘मेरे बच्चे का ॲक्सिडेंट हो गया है.’’
ते ऐकताच मी त्यांच्या गाडीचं दार उघडलं. पाहतो तर काय, त्याचा डावा पाय पूर्णपणे चेंदामेंदा होऊन गेला होता. तो मुलगा अगदी पांढराफटक पडला होता. त्याची नाडी पाहिली, तर ती बरोबर लागत नव्हती. मी मनात म्हटलं,
‘ह्याला मदत मिळाली नाही तर काहीतरी अघटित नक्कीच होणार?’
कसा अपघात झाला ते वहिनींनी थोडक्यात सांगितलं. त्यावेळी काहीतरी मोपा नांवाची दुचाकी निघाली होती. या मुलाला ती चालवायला दिली आणि त्याच्या पायावरून ट्रक गेला आणि त्याच्या पायाची ही अवस्था झाली होती. त्यांची गाडी जिथे उभी होती, त्या बाजूलाच एक रुग्णालय होतं. तेथील डॉक्टर अजून आलेले नव्हते. ज्यांची ते वाट पाहत होते, ते यायला अजून वेळ लागणार होता. मला त्या मुलाची फार काळजी वाटली. त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणं फार आवश्यक होतं, नाहीतर त्याच्या जीवाला धोका होता.
मी हैदरभाई आणि वहिनींना म्हणालो, ‘‘घाबरू नका, त्याच्या नशिबात जे असेल ते होईल, माझ्या मागून त्वरित चला.’’
मी गाडी घेऊन निघालो, मागून हैदरभाईंनी गाडी सुरू केली. आमच्या इथं गांधी चौक नावाचा मुख्य चौक आहे, त्याला वळसा घालून पुन्हा शहरात गेलो. माझे एक डॉक्टर मित्र अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, ते नशिबाने त्यांच्या हॉस्पिटलमध्येच होते.
मी त्यांना सांगितलं, ‘‘हा माझ्या बॅडमिंटनच्या ग्रुपमधल्या मित्राचा मुलगा आहे ’’ त्यांना पूर्ण इतिहास लगबगीने सांगितला व त्वरित उपचार सुरू करण्याची विनंती केली.
ते म्हणाले, ‘‘मी हा पेशंट घेण्यास असमर्थ आहे.’’
म्हटलं, “ कां नाही घेत?’’
म्हणाले, ‘‘मुलाची परिस्थिती इतकी वाईट आहे की काही कमी जास्त झालं तर ते माझ्या अंगलट येईल.’’
मी म्हटलं, ‘‘कशाला घाबरता? मी या ठिकाणी आहे, तुमचा मित्र. तुम्हाला काहीही होणार नाही. घाबरू नका.’’
तशी खात्री दिल्यानंतर त्यांनी लगेचच त्या मुलाला ॲडमिट करून घेतलं. मुलाला तपासलं आणि म्हणाले, ‘‘पेशंट पेशंट खूप सीरियस आहे, वाचणे अशक्य वाटते.’’ त्या मुलाची नाडी लागत नव्हती, तो पांढराफटक पडला होता. शरीरात अत्यंत कमी रक्त असावं, असं सरळ सरळ दिसत होतं. तो खूप गंभीर होता.
ते डॉक्टर म्हणाले, ‘‘डॉ. वासलवार, याला ताबडतोब रक्त द्यायला हवं, रक्ताची व्यवस्था तातडीने करावी लागेल. मी ऑपरेशन करण्याची तयारी सुरू करतो.’’
त्यावेळी मोबाईल नव्हते. हैदरभाईंना मी सांगितले की सर्व नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना त्वरित लॅडलाईनवर फोन करून या रुग्णालयात यायला सांगा. कित्येक बाटल्या रक्त लागू शकते.
ते छोटंसं नर्सिंग होम होतं, खूप मोठं नव्हतं. मी त्याच्या समोरील दारावर दोन्ही हात टेकवून असा उभा राहिलो की मुलावर उपचार सुरू असताना कुणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही, हा हेतू होता. एकेक नातेवाईक, परिचित रक्त तपासण्यासाठी यायला लागले. 
माझे एक मित्र पॅथॉलॉजिस्ट आहेत.
त्यांना सांगितलं, ‘‘जे जे लोक येतील त्यांचा ग्रुप पाहा. त्याचबरोबर ‘ज्यांचं ज्यांचं ऱक्त त्याला चालेल अशा लोकांचं ताबडतोब रक्त घ्या आणि इथं पाठवा. पेशंटची हालत गंभीर आहे. 
हैदरभाईंनी जवळपास शंभरेक लोकांना त्यांच्याकडं पाठवलं होतं. त्यांच्यापैकी वीस नातेवाईक, परिचितांचं रक्त त्याला मॅच झालं. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. एकीकडे त्याच्या नसेतून रक्ताची धार व दुसरीकडे ऑपेरेशन थिएटरमध्ये पायावर शस्त्रक्रिया सुरू होती. तीन तासांत त्या मुलाला एकेक करत २० बाटल्या रक्त दिल्या गेलं. त्या डॉक्टरांनी आपले पूर्ण कसब लावून शस्त्रक्रिया यशस्वी केली. ते डॉक्टर खूप संयमी होते. 
मी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो त्यावेळी त्या डॉक्टरांकडं खूप गर्दी होती.  आमच्या एका नात्यामुळे त्या डॉक्टरांनी खूप जोखीम पत्करून त्या वाईट अवस्थेतल्या मुलावर उपचार केले. .
त्या दिवशी मी घरून साडे सहाला बाहेर पडलो होतो ते साधारण रात्री एक-दीडपर्यंत माझ्या घरच्यांना मी कुठं आहे, हेही माहीत नव्हतं. माझ्या दोन्ही मुली लहान होत्या. त्याही, ‘पप्पा कुठं गेले, पप्पा कुठं गेले, अजून कसे आले नाहीत’ असं विचारत होत्या. पण बराच वेळ मी घरीही फोन करू शकलो नव्हतो. त्या मुलाला सलग २० बाटल्या रक्त दिल्यानंतर मी माझ्या पत्नीला लँडलाईनवरून फोन करून सांगितलं,
‘‘मी अशा कामात अडकलो होतो की मला फोन करता आला नाही; पण तू काळजी करू नको, आता मी पंधरा-वीस मिनिटांत घरी येतो.’’
त्याचा पाय गुडघ्याच्यावर कापावा लागला, कारण त्याचा खालचा भाग पूर्णपणे निर्जीव झालेला होता.  त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना कसं सांगावं, असं त्या डॉक्टरांना वाटत होतं. पण पाय वाचविण्यापेक्षा त्याचा जीव वाचणं आवश्यक होतं, हे आमच्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. त्यामुळं शस्त्रक्रियेआधी ‘पाय कापण्यासाठी आमची परवानगी आहे’, अशी त्याच्या घरच्यांची संमती घेतली, ती जबाबदारी घेऊन मी त्या डॉक्टरांना सांगितलं होतं. 
रात्री एक वाजता सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी घरी आलो. घरी आल्यावर पत्नीला सगळं सविस्तर सांगितलं. 
अतिशय मानसिक शीण येऊन मी झोपलो, पण झोप लागत नव्हती. सकाळी सहाला उठून परत त्याला जाऊन मी पाहिलं, 
त्याला हाक मारली, ‘‘कैसे हो बेटा ?’’
त्यानं डोळे उघडले. माझ्याकडं पाहिलं.
म्हणाला, ‘‘अंकल, कल आप थे क्या मेरे साथ मे?’’
मी म्हटलं, ‘‘हो, मीच तुझ्याबरोबर होतो.’’
त्यानंतर त्याच्या डोळ्यांतून अश्रू निघाले, माझ्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. हैदरभाई आणि त्याच्या पत्नीला बाहेर जाऊन मुलगा सुरक्षित असल्याचं सांगितलं. हैदरभाईनं तर मला कडकडून मिठी मारली. आम्ही दोघंही खूप रडलो. त्याला जीवदान मिळालं होतं. 
त्या मुलाला रुग्णालयात नेताना संध्याकाळच्या वेळेला वाहतुकीच्या गर्दीतून त्या शहरात आम्ही गाडी इतकी वेगाने चालवली होती की, मलाही भीती वाटत होती. ती एक प्रकारची जोखीमच होती. आम्हाला सर्वांनाच ते आठवलं. शेवटी त्या वहिनींच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहिले. ते अश्रू त्यांचा मरणासन्न अवस्थेत असलेला मुलगा सुरक्षित असल्याचे होते.
त्यावेळी चंद्रपूरमध्ये स्पेशालिटी हॉस्पिटल्स नव्हतीच. एकही मोठं हॉस्पिटल नव्हतं.  त्याला रुग्णालयात नेऊन उपचार होईपर्यंतचे ते सहा-सात तास खूप थ्रिलिंग गेले.
आता तो मुलगा काहीतरी व्यवसाय करतोय. त्यांचं लग्न झालंय. त्याला दोन मुलंही आहेत. दरवर्षी ईदच्या सणाला शिर-खुरमा घेऊन येतो. त्याच्याकडील शिर-खुरमा खाताना माझं मन मला म्हणतं, ‘ याची चव काही औरच आहे, कारण अश्रूंची फुले होतानाच्या अबोल भावना यात सामावलेल्या आहेत.’

-डॉ. अशोक वासलवार
चंद्रपूर
ashok50wasalwar@gmail.com

Post a Comment

0 Comments