२७ जिल्ह्यातील ८९ जणांनी केले होते अर्ज !
चंद्रपूर (का. प्र.)
युवा अभ्यासकांना प्रेरणा व प्रोत्साहन देऊन उत्तम दर्जाचे लेखन मिळवण्यासाठी पुणे येथील नामांकित व प्रतिष्ठित साधना प्रकाशन तथा साप्ताहिक संयोजित प्रा. श्रीकांत तांबे व प्रा.ल. बा. रायमाने यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 'तांबे-रायमाने अभ्यासवृत्ती' राज्यातील तरुण अभ्यासकांना देण्यात येतो. यंदाची ही प्रतिष्ठित अभ्यासवृत्ती कोरपना तालुक्यातील बिबी येथील कवी, मुक्तपत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांना जाहीर झाली आहे. रोख ५० हजार रुपये असे अभ्यासवृत्तीचे स्वरुप आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प : विकास की आदिम माडीया आदिवासींचे विस्थापन ?' हा त्यांचा अभ्यास विषय आहे. पुढील सहा महिन्यांत त्यांच्याकडून सदर विषयावर दीर्घ लेख लिहून घेतले जाणार असून ते सर्व लेखन साधनाच्या दोन विशेषांकातून प्रसिध्द केले जाणार आहे.
पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण तरूणींना देण्यात येणाऱ्या या अभ्यासवृत्तीसाठी राज्यातील २७ जिल्ह्यांतून ८९ अर्ज आले होते. यात अविनाश पोईनकर यांच्या प्रस्तावाची व करत असलेल्या कामाची दखल घेत अंतिम मुलाखतीतून निवड करण्यात आली. समाजशास्त्राचे अभ्यासक असलेले मराठीतील आघाडीचे लेखक मिलिंद बोकील व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक, पत्रकार आसाराम लोमटे यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे. गडचिरोलीतील
सुरजागड लोहखदान प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या माडिया आदिवासींच्या प्रश्नांवर अविनाश पोईनकर प्रत्यक्ष अभ्यास करत आहे. नक्षलग्रस्त चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण विकास, पेसा व वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठीही कार्यरत आहेत. अभ्यासवृत्तीमुळे या विषयावरील अभ्यास, आंदोलने व आदिवासींच्या जगण्यावरील परिणाम सखोल संशोधनात्मक व चिकित्सक पद्धतीने मांडता येईल, असे मत अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले.
0 Comments