चंद्रपूरसह चार जिल्ह्यात बाधितामागे ४ ते ७.८ एवढ्याच संपर्कातील लोकांचा शोध !




  • तर कोरोना पुन्हा वाढू शकतो.....!
  • राज्यात सरासरी ४.२ टक्के लोकांनाच शोधण्यात आल्याची धक्कादायक बाब !
  • राज्यातील कोरोना रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यात महाराष्ट्र अपयशी !
  • संपर्कातील लोकांना शोधण्याबाबत जेवढी काळजी घेणे आवश्यक आहे, तेवढी ती घेतली जात नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचा निष्कर्ष !

मुंबई : राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला २२८ दिवस झाले असून, अजूनही एका कोरोना रुग्णामागे संपर्कातील किमान २0 लोकांना शोधण्याच्या आदेशाचे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. राज्यातील ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ टक्के लोकांनाच शोधण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३१ जिल्ह्यात आरोग्य विभागाने कोरोना रुग्ण संपर्कातील किती व्यक्ती शोधल्या? याचा आढावा घेतला तेव्हा ३१ जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सरासरी १0 लोकांना शोधण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा राज्यातील सर्व जिल्ह्यात रुग्ण संपर्कातील किती लोकांना शोधण्यात आले याची पाहाणी केली. या पाहणीत गंभीर रुग्णांच्या ( हाय रिस्क) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ टक्के लोकांचाच शोध घेतल्याचे, तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ टक्के लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के एवढे झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्ण संख्याही कमी होताना दिसत आहे. मात्र रुग्ण संपकार्तील लोकांना शोधण्याबाबत जेवढी काळजी घेणे आवश्यक आहे, तेवढी ती घेतली जात नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. "माझे आरोग्य माझी जबाबदारी" या योजनेमुळे अनेक रुग्ण शोधता आले तसेच कोमॉर्बिड लोकांचा शोध लागून, त्यांना सावध करता आल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.
चंद्रपूरसह सातारा, सोलापूर, औरंगाबाद, यवतमाळ आदी जिल्ह्यात एका कोरोना रुग्णामागे ४ ते ७.८ एवढेच संपर्कातील लोकांना शोधण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. यातील गंभीर बाब म्हणजे ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर या कोरोना रुग्णांची मोठी संख्या असलेल्या भागात योग्य काळजी न घेतल्यास कोरोना पुन्हा वाढू शकतो अशी भीती डॉक्टरांना वाटते. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ४३,0१५ बळी गेले आहेत, तर मुंबईत १0,00८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूंपैकी एकट्या मुंबईत ८.५ टक्के मृत्यू झाले असून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर तसेच सॅनिटाइझेनचे योग्य पालन न झाल्यास मुंबईचे चित्र पुन्हा बदलू शकते, असे टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments