आठवी ते बारावीच्या वर्गांप्रमाणेच इतर वर्ग सुरू करावेत का?



  • SCERT चे सर्वेक्षणात निष्कर्ष!

मुंबई : कोविडमुक्त गावातल्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भागात पहिली ते सातवीच्यादेखील शाळा सुरू व्हायला हव्यात का याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.

करोनामुक्त भागामध्ये आठवी ते बारावीच्या वर्गांप्रमाणेच इतर इयत्तांमधील वर्ग सुरू करावेत का, या प्रश्नाचे उत्तर आता पालक आणि शिक्षकांकडून शोधले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे (SCERT) ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षकांकडून मते नोंदवली जाणार आहेत.

या सर्वेक्षणाच्या अहवालातून शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षक आग्रही आहेत, का याचे उत्तर मिळू शकणार आहे. १२ जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असल्याचे 'एसीईआरटी'तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात करोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याची परवानगी राज्याच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक तज्ज्ञ आणि शैक्षणिक संस्थांकडून इतर वर्गही सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु, या शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होत असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. यापुढील काळामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळायचे असेल, तर शाळा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असा प्रवाह आता निर्माण झाला असून, योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेतली जाणार आहेत, अशी माहिती 'एससीईआरटी'चे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
हे सर्वेक्षण केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित न ठेवता, शहरातील पालक आणि शिक्षकांनाही यामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. शहरांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि शिक्षकांची मते काय आहेत, यावर भर दिला जाणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जो निष्कर्ष निघेल, तो शिक्षण विभागाला सादर केला जाणार असून, त्यानंतर उर्वरित इयत्तांच्या शाळा सुरू होणार की नाही, याचे उत्तर मिळू शकणार आहे.

असे नोंदवा मत : 'एससीईआरटी'तर्फे एका लिंकद्वारे ऑनलाइन सर्वेक्षण केले जाणार असून, त्यामध्ये करोनाविषयक उपाययोजना करून शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची तयारी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. http://www.maa.ac.in/survey या लिंकद्वारे पालक आणि शिक्षकांना आपली मते नोंदवता येणार असून, १२ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे.

Post a Comment

0 Comments