मी माझ्या पगारात समाधानी आहे ! I am satisfied with my salary!



कर्तव्यात जागरूक गटविकास अधिकाऱ्यांने आपल्या कार्यालयासमोर लावला बोर्ड !


चंद्रपूर (वि. प्रति . )
“लोकसेवक म्हणुन नोकरी करतांना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा असुन अधिक माया जमविण्याची आपली ईच्छा नाही. कार्यालयात काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवण्याची गरज नाही. जे योग्य काम आहे ते मार्गी लागणारचं.”, आजच्या परिस्थितीत असे विचार एखाद्या शासकीय अधिकाऱ्याकडून व्यक्त केल्या जात असेल साहजिकचं आश्चर्य वाटेल परंतु असे घडले आहे. सातारा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे (रा. लातुर) यांनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागात ‘मी माझ्या पगारात समाधानी आहे.' या आशयाचा लावलेला बोर्ड आणि त्या खाली लिहीलेला 'मी दौऱ्यावर असतांना भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर निवेदने, तक्रारी लेखी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रयानंतर व्हॉटस्अॅप मेसेज नांव व गावाच्या उल्लेखासह) अरावा.' या आशयाचा मजकुराची चर्चा जिल्ह्यातचं नव्हे तर राज्यात होऊ लागली आहे. एका प्रादेशिक वर्तमानपत्राने साताराचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे ( रा. लातुर) या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची प्रकाशित केलेली बातमी सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन या अधिकाऱ्यांची सगळीकडे मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. असे कर्तव्यदक्ष अधिकारी ज्या जिल्ह्याला मिळाले त्या जिल्ह्यात शासकीय कामांविषयी सर्वसामान्यांची निराशा होणार नाही असे मत व्यक्त होवू लागले आहे.

बातमीवर click करा व वाचा......

सरकारी काम आणि बारा महिने थांब !. !.....!!



‘सरकारी काम आणि बारा महिने थांब!' अशी एक म्हण फार पुर्वीपासून प्रचलित आहे. त्याचा अनुभव ही अनेकांना अनेकदा होत असतो. आपल्या कर्तव्याप्रती सर्वांनी जागरूक असल्यास भ्रष्टाचार, अनियमितता यावर आपसुकचं आळा बसतो परंतु तसे होतांना फार कमी दिसते. काही महिन्यांपुर्वीच गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातील आलापल्ली तहसिलीतील एका वरिष्ठ (राजपत्रित) अधिकाऱ्याने चक्क आपल्या कार्यालयालाचं कुलूप लावून त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याप्रतीचा उदासिनतेवर नाराजी व्यक्त केली होती. वारंवार सुचना व कारणे दाखवा नोटीसी बजावुन ही अधिनस्त कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाही. दिलेले कामे वेळेवर करीत नाहीत. कार्यालयात येवून फक्त वेळ दवडतात, वारंवार सुचना देऊन ही कामात सुधारणा होत नसल्याचे बघून या वरिष्ठ अधिकाऱ्याने चक्क आपल्याच कार्यालयाला कुलूप लावण्याचे धाडस केले. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कामाप्रती उदासिनता, वेळकाढू धोरणाचा सामान्यजणांना अनेकदा फटका बसतो. त्यातुन मग प्रशासनाप्रती निर्माण होणारा असंतोष वाढतचं जातो. पंचायत समितीमध्ये कार्यरत गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी खऱ्या अर्थाने अशा कर्तव्याप्रती उदासिन असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यासमोर एक आदर्श उभा केला आहे. पंचायत समिती स्तरावर आज बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामसेवक आपल्या कामाप्रती प्रामाणिक नसतात. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या कार्यालयासमोर वेगवेगळ्या निधीतुन कोणती विकास कामे करण्यात आली याचा फलक दर्शनी भागात लावायला हवा परंतु तसे क्वचितच बघायला मिळते. अनेक कामे तर फक्त कागदावर झालेली बघायला मिळतील. बहुतेक शासकीय कार्यालयामध्ये पारदर्शकतेचा अभाव बघायला मिळतो. जिल्ह्यात करोडो रूपयांच्या इमारतींमध्ये अनेक कार्यालये स्थित आहेत. परंतु या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत इक्का-दुक्का कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही बघायला मिळत नाही. अधिकारी कुठे गेले याची माहिती विचारली असता 'फिल्ड' वर हे ठरविलेले उत्तर बहुतेक कार्यालयात मिळते. साहेब व्हिसी मध्ये आहेत किंवा कर्मचारी मोबाईलवर काही तरी बघत असल्याचे चित्र आज शासकीय कार्यालयात सामान्य झाले आहे.
    नुकतेच एका कार्यालयात भेट देण्यास एका पक्षाचे शिष्टमंडळ गेले असता कार्यालयीन वेळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये 'भीसी' सुरू असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. त्या भीसीसाठी कार्यालयातील भीसी मध्ये समाविष्ठ असलेले सारेच कर्मचारी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये स्वतःच्या टेबलवरील लाईट सुरू ठेवून जमा झाले होते व संपूर्ण कार्यालयात स्मशान शांतता होती, निवेदन द्यायला आलेले ते शिष्टमंडळ भीसी संपेस्तोवर मस्तकावर हात ठेवून ताटकळत उभे राहिले. वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यालयीन वेळेत केलेल्या या कृत्याचे कुठवर समर्थन करता येईल, यांची तक्रार करावी म्हटले तर तो प्रसंग कुठे नोंदीत नव्हता. या प्रकरणाची फक्त चर्चा करण्यापुरता त्या पदाधिकाऱ्यांपाशी पर्याय राहिला नाही. मला कार्यालयीन वेळेत फक्त आणि फक्त कार्यालयीन कर्तव्यचं पुर्ण करायचे आहे अशी मानसिकता ज्यावेळी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये येईल त्याचवेळी 'मी माझ्या पगारात समाधानी आहे.' असे वातावरण निर्मीती होईल. सतीश बुद्धे सारखे एखादे तरी अधिकारी प्रत्येक विभागाला लाभावे, हीच आज सर्वसामान्यांना नागरिकांची ईच्छा आहे.

Post a Comment

0 Comments