पोलिसाला जप्तीची कार वापरने भोवले ! The police used a seized car!



महागडी कार चालविण्याच्या मोहामुळे मुद्देमाल मोहरीर हवालदाराला व्हावे लागले निलंबित !

नागपूर (वि. प्रति. ) : आरोपींकडून जप्त केलेल्या कार, दुचाकी, टिव्ही, एसी आणि अन्य वस्तू पोलीस ठाण्यातील मालखान्यात जमा केल्या जातात. त्यानंतर आरोपीला न्यायालयाच्या आदेशानंतर सुपूर्दनाम्यावर त्या वस्तू परत कराव्या लागतात. मात्र आरोपीच्या मालकीच्या जप्त वस्तूंचा आणि वाहनांचा थेट पोलीस कर्मचारी वापर करीत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर येथे घडला. हुडकेश्वर ठाण्यातील पोलिस हवालदाराला आरोपीची महागडी कार आवडल्याने त्याने कार घरी नेल्याची घटना नागपूर येथील हुडकेश्वर येथे उघडकीस आल्यानंतर नागपूर चे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी प्राथमिक चौकशीनंतर हुडकेश्वर पोलिसचे मुद्देमाल मोहरीर हवालदार अजय गिरी यांना निलंबित केले असुन या चौकशीत अन्य अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर ही योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस हवालदार हे पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात काम करतात. मात्र, आरोपीची कार वापरल्यामुळे पोलीस उपायुक्तांनी केवळ हवालदारास निलंबित केले. मात्र पोलीस निरीक्षकांची चौकशी होणे गरजेचे होते. पोलीस ठाण्यातील प्रत्येक घडामोडीला निरीक्षक जबाबदार असतात. मात्र या प्रकरणात निरीक्षक मोकाट तर कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सविस्तर वृत्त असे की, हुडकेश्वर पोलिस ठाण्यात प्रशांत मोहोड नावाच्या एका व्यक्तीवर आर्थिक स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १३ जानेवारी ला हुडकेश्वर पोलिसांनी मोहोड यांची महागडी कार (एमएच ३१-एफआर ८०२२) जप्त केली. ती कार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली. हुडकेश्वर चे मुद्देमाल मोहरीर हवालदार अजय गिरी यांना ती कार खूपच आवडली. ती कार चालविण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी मालखान्यातून कारची चाबी काढली व कार थेट घरी घेऊन गेले. काही दिवसांतच अजय गिरी यांचा कारमध्ये जिव गुंतला. हवालदार अजय गिरी हे कार घेऊन नातेवाईकांकडे जायला लागले. तसेच बाहेरगावी कुटूंबासह फिरायलाही घेवून जात होते. महागडी कार चालवण्याचा मोह आवरू न शकलेल्या अजय गिरी यास अखेर नागपूरचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी चौकशीअंती निलंबित केले या प्रकरणामुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे.
आर्थिक स्वरूपाचा गुन्हा दाखल असलेले मोहोड हे कारागृहातुन जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या कारचा सुपूर्दनामा सादर केला. मात्र त्यांना कार पोलिस ठाण्यात दिसली नाही. कार थेट मुद्देमाल मोहरीर हवालदार अजय गिरी यांच्या बिडीपेठ येथील घरी उभी दिसली. दुसऱ्या दिवशी हवालदार गिरी कार घेऊन कुटूंबासह फिरायला जातांना दिसला. त्यानंतर मोहोड यांनी पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याकडे तक्रार केली. व अजय गिरी यांना निलंबनास सामोरे जावे लागले. या घटनेमुळे नागपूर पोलिसांत खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments